औरंगाबाद- राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येत असेल, तर विरोध का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच तसेच एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा कायदा, असा प्रकार राज्यात सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मागे नेल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे.
पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सूड उगवण्याचे काम करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नाही. खून होत आहेत. दरोडे पडताय, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट येणे गरजेचं आहे, असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम नाही. राज्याचे प्रश्न त्यांना माहिती नाही. ८९ हजार कोटींचा तूट आहे. राज्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.
राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राष्ट्रपती राजवट लावली तर राज्यातील जनता पेटून उठेल, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. विरोधकांचे आता सर्व उपाय संपले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न दिसत आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. त्यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात भाजपा रडीचा डाव खेळत असून, मात्र याला महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम राज ठाकरे करीत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांना परवानगी कशी द्यायची, असा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर उभा राहतो, असं जयंत पाटील म्हणाले.