- बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणाचे मागणीसाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय .याचा अनुभव शनिवारी रात्री गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनाही आला. जय भवानी नगर येथे एका कार्यक्रमासाठी ते आले असता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडविला .यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या घटनेविषयी प्राप्त माहिती नुसार राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जय भवानी नगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते .याविषयी माहिती मिळतात या परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावे यांच्या कार्यक्रमाकडे धाव घेतली .तोपर्यंत कार्यक्रम संपुन सावे हे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडविला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले भाजपचे पदाधिकारी संजय केणेकर यांनी कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला .मात्र कोणी त्यांच ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते .मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही काय केले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही सरकारमध्ये असूनही आवाज का उठवीत नाहीत? अशा प्रश्नांचा भडीमार कार्यकर्त्यांनी सावे यांच्यावर केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सावे यांच्या वाहनांच्या समोर लोटांगण घेतले .कार्यकर्ते जय भवानी ,जय शिवाजी ,एक मराठा, लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत होते .यावेळी सावे हे त्यांचा ताफा तेथे सोडून एका कार्यकर्त्याच्या दुचाकी वर बसून तेथून निघून गेल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली.