पाचोड : वाढत्या वयोमानाचा विचार करता २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातून मी बाहेर पडणार (रिटायर) आहे. आपला वारसा पुढे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जि.प. सदस्य विलास भुमरे यांनी चालवावा, अशी अपेक्षा मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली. घराणेशाही नाही; पण मुलगा विलास मतदारांच्या आशीर्वादामुळे आमदार होईल, असा आशावाद त्यांनी पाचाेडला झालेल्या शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात संदीपान भुमरे रोहयो व फलोत्पादन मंत्री असून, त्यांच्याकडे ते यवतमाळचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. शिवसेनेच्या बळावर ते पाचव्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत. या कामगिरीमुळे त्यांना ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाले; परंतु आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणातून मी रिटायर होणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेकडून राज्यभरात सध्या शिवसंपर्क अभियान राबवले जात असून, पैठण मतदार संघातील त्यांच्याच गावात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शुक्रवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात असे वक्तव्य केलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी २०२४ च्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलगा विलास भुमरे रिंगणात उतरणार असून, तो जनतेच्या व मतदारांच्या आशीर्वादामुळे निश्चितच निवडून येईल, असा आशावाद मंत्री भुमरे यांनी व्यक्त केला. पाचोड ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव पडुळे, सरपंच शिवराज भुमरे, भागवत नरवडे, सुनील मेहेत्रे यांच्यासह आदी उपस्थित हाेते.
---- घराणेशाही नाही जनतेचे आशीर्वाद ----
मंत्री भुमरे यांचे बंधू राजू भुमरे हे सरपंच पदावरून रिटायर होत पुढे सभापती झाले. त्यांचा मुलगा शिवराज आज सरपंच झाला आहे, तसेच २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी पण रिटायर होणार असून, मुलगा विलास भुमरेला शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देणार असल्याचे त्यांनी जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले. यावरही न थांबता त्यांनी विकासाच्या बळावर विलास भुमरेसुद्धा माझ्यासारखा प्रदीर्घ काळ विधानसभेत प्रतिनिधित्व करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; पण आपण यास घराणेशाही म्हणू शकत नाही. विकास कामांच्या बळावर मी पाचव्यांदा विधानसभेत पोहोचलो आहे. तसाच मुलगा विलाससुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे यशस्वी होईल, असे वक्तव्य मंत्री भुमरे यांनी व्यक्त केले.
-----
240721\24_2_abd_108_24072021_1.jpg
पाचोड