औरंगाबाद- हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहे आणि ते त्यांना जनतेने दिलेलं पद आहे, असं मंत्री दीपक केसकर यांनी सांगितलं. दीपक केसरकर औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.
ठण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा बिडकीन येथून जाताच शिवसैनिकांनी 'पन्नास खोके एकदम ओके' च्या घोषणा देत रस्त्यावर गोमूत्र शिंपडले. मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्याचे गोमूत्राद्वारे शुद्धीकरण केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे. यावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, ज्या गावांमध्ये हजारो लोकांमध्ये प्रत्येक मनुष्य रस्त्यावर आला. काही लोकांनी त्या ठिकाणी गोमूत्र टाकून सफाई केली असं ऐकलं. मात्र त्या गावांमध्ये गोमूत्र घालणारेच कार्यकर्ते शिल्लक राहिले असतील. त्यामुळेच त्यांच्यावर हे काम करण्याची वेळ आली. शेवटी लोकांचा आपल्याला पाठिंबा राहत नसल्याने पक्ष कुठल्या पातळीवर जाऊ शकतो, हे यावरुन सिद्ध होते, असे दीपक केसकर म्हणाले.
दरम्यान, बिडकीन येथे कार्यकर्त्यांनी त्यांची लाडूतुला करण्याचे नियोजन केले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी उशीर झाल्याचे सांगत स्वागत स्वीकारून लाडू तुला स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट पैठणकडे रवाना झाला. मात्र, निलजगाव फाटा येथून ताफा जाताच शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पेरे, माजी सरपंच अशोक धर्मे आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी 'पन्नास खोके एकदम ओके' घोषणा देत त्या मार्गावर गोमूत्र शिंपडले. हातात गोमूत्र भरलेल्या बकेट घेऊन जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर सर्वत्र गोमूत्र शिंपडत निषेध केला.