गंगापूर : येथील नगरपालिकेच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगरविकास प्रधान सचिव यांना दिले आहेत. याप्रकरणी अधिकारी, कर्मचारी, सत्ताधारी यांच्या विरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी कॉंग्रेस नगरसेवकांनी राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे केली होती.
काँग्रेस नगरसेवक अशोक खाजेकर व सोनाली पाटील यांनी माहितीच्या अधिकाराखाली गंगापूर नगरपालिकेच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मागितली होती. त्यानुसार एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान नगरपालिका अधिकारी व सत्ताधाऱ्यांनी १ कोटी ७५ लाखांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की, मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता यांनी नातेवाइकांच्या नावे निविदा काढून पालिका अध्यक्षांना सोबत घेऊन भ्रष्टाचार केला आहे, तसेच इतर चार वर्षात पालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. तरी अधिकारी, कर्मचारी व अध्यक्ष यांनी संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्यमंत्री तनपुरे यांनी नगरविकास प्रधान सचिव यांना सदरीलप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोट
१५ वर्ष सत्ता असताना विरोधकांना भरीव काम करता आले नाही. त्यामुळे आमच्या काळात होत असलेली कामे सहन होत नसल्याने शहराच्या विकासात अडथळा आणण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असू शकतो. चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, जनतेला दिलेल्या वचनाप्रमाणे शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. - वंदना प्रदीप पाटील, नगराध्यक्ष, न. प. गंगापूर.