औरंगाबाद : सिल्लोड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत गेलेले महसूल राज्यमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी आडून आगामी लोकसभा निवडणुकीचे व्हिजन तर हाती घेतले नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.
गंगापूर, कन्नड, खुलताबाद, औरंगाबादमधील जुन्या व नव्या शहरात राज्यमंत्री सत्तार यांनी पायात भिंगरी बांधल्याप्रमाणे पाहणी करीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नुकसानग्रस्त भागाचे पाहणीसत्र सध्याही सुरू आहे. परंतु, या सगळ्यांमागे आगामी लोकसभा निवडणुकीची गणिते दडल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यमंत्र्यांनी शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन नुकसानीसंदर्भात चर्चा केली. यात पूर्व मतदारसंघ विधानसभा संघटक राजू वैद्य यांच्या निवासस्थानी जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, आदी पदाधिकाऱ्यांसह राज्यमंत्री सत्तार यांचे झालेले चहापान शिवसेनेतील अंतर्गत वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.
सिल्लोड मतदारसंघातून राज्यमंत्री सत्तार यांचे चिरंजीव विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील असे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांना मतदारसंघाची शोधाशोध करण्याची वेळ येऊ शकते. शिवसेनेत सत्तार यांचा चांगलाच जम बसला आहे. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचे गणित जुळवून राज्यमंत्री स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दावा करण्याच्या तयारी असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
महापालिकेच्या अनुषंगाने आणले असेल समोर?
गेल्या लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पराभव करीत लोकसभेत प्रवेश मिळविला. त्यामुळे शहरात एमआयएमचे वर्चस्व वाढले आहे. त्याला ब्रेक लावण्यासाठी सत्तारकार्ड वापरण्याचा विचार शिवसेनेचे वरिष्ठ करीत असतील. त्यामुळेच मुस्लिमबहुल भागात सत्तार यांनी प्रथम पाहणी करीत नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामागे महापालिका निवडणुकीसाठी सत्तार यांना समोर करण्याची खेळीदेखील पक्षश्रेष्ठींच्या मनात असू शकते, असे बोलले जात आहे.