जालना : निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणातील ताणतणाव दूर ठेवत मूळचे शेतकरी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी रामनगर येथे त्यांच्या शेतात लावलेल्या द्राक्ष बागेत चक्क छोट्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली आणि शेतीपासून आपण दूर गेलो नसल्याचा प्रत्यय या निमित्ताने सर्वांना आला. पशुसंवर्धन, मत्स व्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे तसे गाढेसावरगाव येथील शेतकरी. शालेय जिवनापासून जालन्यात आल्याने शेतीशी तसा संबंध कमीच झाला. पण रामनगर येथी साखर कारखाना परिसरात असलेल्या १५ एकर कोरडवाहू शेतजमिनीत त्यांनी गतवर्षी मार्च महिन्यात द्राक्ष बागेची लागवड केली. एवढ्यावरच न थांबता जालन्यात मुक्कामी असले की आवर्जून बागेची पाहणी ही ठरलेलीच. या बागेवर त्यांनी सुरुवातीपासूनच जातीने लक्ष ठेवले आहे. त्यामुळेच अगदी कमी कालावधीत त्यांची द्राक्ष बाग फुलली आहे. नियमितपणे बागेची पाहणी ते करीत असल्याने या बागेवर कुठला रोग पडला, की एखादी समस्या निर्माण झाली याबाबत ते नेहमीच सजग असतात. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सर्वत्र सुरू आहे. तिकीट मिळविण्याठी कार्यकर्त्यांसह इच्छुकांचा गराडा घराभोवती पडलेला सध्या दिसून येतो. यातून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी शेतीसारखी दुसरी योग्य जागा असू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यातूनच सोमवारी त्यांनी साखर कारखाना गाठला आणि थेट शेतात जात ट्रक्टरद्वारे नांगरणीला सुरुवात केली. शेती आणि कृषी संस्कृतीची जपणूक त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. (प्रतिनिधी)
राज्यमंत्र्यांना लागली ‘द्राक्षा’ची गोडी...!
By admin | Published: January 31, 2017 12:23 AM