प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादआपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, मुंबईतील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यातील ६ जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बालमन हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात राज्यातील मुंबई, कल्याण, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांत १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ६७ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ७४ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. ५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत, तर ६० टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कदायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला- मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही समोर आले. सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. दिवसातून एकदा तरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैन थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हातळावा अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. इंटरनेट आॅडिक्शनमानसिक आजारात आता ‘इंटरनेट आॅडिक्शन’चा नव्याने समावेश झाला आहे. प्रौढांप्रमाणेच अल्पवयीन मुलेही इंटरनेटच्या अतिआहारी जात आहेत. यातून पोर्न व्हिडिओ पाहणे, ते पाठविणे, तसेच वेळ मिळेल तेव्हा चॅटिंग करणे, त्याशिवाय बेचैन होणे, अशी लक्षणे दिसून येतात. मोबाईलमुळे इंटरनेटचा वापर एवढा सोपा झाला आहे की, लहान मुलेही सहजपणे ते हातळत आहेत. इंटरनेटपासून रोखणे कठीण आहे. त्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव पालकांनी आपल्या पाल्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लैंगिक शिक्षण देणे आवश्यक झाले आहे. -डॉ. आनंद काळे, मानसोपचार तज्ज्ञइंटरनेट वापराचा अतिरेक स्मार्ट फोन हातात नसला की, ही मुले अस्वस्थ होतात. टच स्क्रीन फोन तर त्यांना अधिक अधीर बनवत आहे. टायलेटमध्ये जातानाही स्मार्ट फोन सोबत घेऊन जातो, असे काही मुलांनी सांगितले. एवढा अतिरेक झाला आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे होत असलेले दुर्लक्ष हेच यास कारणीभूत ठरत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. स्मार्ट फोन घेऊन दिला तर इंटरनेटवर मुलगा काय करतो, यावरही जातीने सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून एकदातरी त्यांनी मुलांचा मोबाईल तपासावा. पालकाचे लक्ष असले तर धाकाने मुले अश्लील फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करून घेणार नाहीत.-रेणुका कड, कार्यक्रम समन्वयक, कम्युनिटी ट्रस्ट, मुंबईसर्वेक्षण कसा केलाकम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेश शेळके, सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता कुलकर्णी, प्रा. युसूफ बेन्नुर व प्रा. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे एप्रिल-मे २०१४ दरम्यान राज्यातील ६ जिल्ह्यांत करण्यात आला. रेणुका कड, मयुरी मालवी, करुणा महंतारे, सरिता तिवारी, कविता सरविय्या यांनी सर्व्हे केला. सहा जिल्ह्यांतील १० ते १९ वर्षे वयोगटातील ५०० मुला- मुलींशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेण्यात आली. त्यातून रँडम सॅम्पलिंग पद्धतीने सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आले.
अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
By admin | Published: June 25, 2014 1:22 AM