औरंगाबाद : डॉक्टर मुलीने चोरून आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचे समजल्यावर आईवडिलांनी हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले. शिवाय तिचा मोबाईल काढून घेतला. ही बाब समजल्यावर तिच्या पतीने थेट पोलीस ठाणे गाठून याविषयी तक्रार केली. यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांचे समुपदेशन करून नव विवाहित प्रेमीयुगुल जोडप्याला पोलीस ठाण्यात सर्वांसमोर एकमेकांना पुष्पहार घालायला लावत पुन्हा एकदा विवाह घडवून आणून शुभेच्छा दिल्या.
गारखेडा परिसरातील रहिवासी तरुणी सुनीता (नाव बदलले आहे) बीएचएमएसच्या अंतिम वर्षात शिकत आहे. सात वर्षापासून तिचे विवेक हराळे (रा. सातारा परिसर) याच्यासोबत प्रेम संबंध आहेत. विवेकच्या आईवडिलांचा त्यांच्या लग्नासाठी पाठिंबा होता. तर सुनीताचे आईवडिलांची आंतरजातीय प्रेमविवाहासाठी तयारी नव्हती. यामुळे मे २०१९ मध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोंदणी पध्दतीने लग्न केले. मात्र, तेव्हापासून ते पतीपत्नीसारखे एकाच छताखाली न राहता आप आपल्या घरी राहात होते. दरम्यान, चार दिवसांपूर्वी दोघांनी सुनीताच्या आईवडिलांना त्यांनी लग्न केल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी विरोध दर्शवित लग्न मान्य नसल्याचे सांगितले. विवेक तेथून निघून त्यांनी सुनीताचा मोबाईल काढून घेतला. तसेच तीचे स्वजातीय तरुणासोबत लग्न लावून देण्यासाठी तयारी दर्शविली.
या प्रकारामुळे सुनीताने स्वतःच्या हातावर ब्लेड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब समजताच विवेकने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. सोबत लग्न केल्याचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचे समुपदेशन केले. कायद्यानुसार दोघेही सज्ञान आहेत. शिवाय त्यांनी विवाह केला असल्यामुळे ते पतीपत्नी आहेत. त्यांना कुठे आणि कोणासोबत राहायचे हा निर्णय ते घेऊ शकतात असे सांगितले. यानंतर विवेक आणि सुनीता यांच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांच्या समोर सुनिता आणि विवेक यांना एकमेकांना पुष्पहार घालायला लावून एक प्रकारे त्यांचे पुन्हा लग्न लावले.
विवाहासाठी पोलीस बनले वऱ्हाडीसुनीता आणि विवेक या जोडप्याला एकत्र आणण्यासाठी पोलीस ठाण्यात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी महत्वाची भूमिका निभावली. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके आणि पोलीस ठाण्यात हवालदार, महिला पोलीस कर्मचारी यांनी वऱ्हाडीची भूमिका साकारत चटई अंथरली काहीनी पाट आणले आणि वधू वराना शुभेच्छा दिल्या.