- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरात सोडले जाणारे दूषित पाणी रोखण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय देऊन तब्बल ३२ वर्षे उलटली आहेत. न्यायालयात शपथपत्राद्वारे दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास प्रशासनाला अपयश आल्याने सलीम अली सरोवराची गटारगंगा होण्याच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू आहे. सरोवराच्या या दयनीय अवस्थेने व्यथित झालेले याचिकाकर्ते, इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी हे सरोवर वाचविण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे.
ड्रेनेजचे दूषित पाणी सलीम अली सरोवराचे अस्तित्वच संपविणार, हा धोका लक्षात येताच डॉ. शेख यांनी १९८९मध्ये खंडपीठात धाव घेतली होती. सरोवरात सोडलेले दूषित पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली. तेव्हा सिडको प्रशासनाने खंडपीठाला शपथपत्र देऊन एका वर्षात दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. उद्देश सफल झाल्याने ती याचिका निकाली काढण्यात आली. मात्र, ३२ वर्षे उलटल्यानंतरही दूषित पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. सिडको प्रशासनाने दूषित पाणी रोखण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत. उलट हा प्रकार आता राजरोसपणे सुरू आहे, अशी खंत डॉ. शेख यांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केली.
मलीक अंबरने १६१० ते १६१६ या काळात या तलावाची निर्मिती केली. औरंगजेब यांच्या कार्यकाळात हिमायतबागेची उभारणी झाली. पूर्वी सलीम अली सरोवरात कमळाच्या फुलांची चादर पसरलेली असायची. १९९० पर्यंत शहरातील नागरिकांनी या नयनमनोहर दृष्याचा आनंद घेतला आहे. १९८०च्या दशकात सरोवरात दूषित पाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे कमळ हळूहळू नष्ट झाले. इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी दोनदा पुन्हा कमळ लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूषित पाण्यामुळे कमळ जगतच नसल्याचा अनुभव त्यांना आला.
पालिकाच सोडते सरोवरात दूषित पाणीसन २०१०मध्ये महापालिकेने ३ कोटी रुपये खर्च करून सरोवराच्या बाजुला ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला. मागील ११ वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी सरोवरात सोडण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले पाणी किती दूषित आहे, याचा विचारच मनपा प्रशासन करायला तयार नाही.
सरोवराच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्षऐतिहासिक वारसा सांभाळणे हे शहराचे कर्तव्य आहे. सरोवराच्या चारही बाजूने अतिक्रमणे होत आहेत. दूषित पाणी सोडण्यात येत आहे. काही वर्षांनंतर येथे सरोवर होते, असे म्हणायची वेळ येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. सरोवराला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करायला हवेत.- डॉ. रमजान शेख, इतिहासतज्ज्ञ.