छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत १२ लाख ६८ हजार ८ शेतकऱ्यांचे ८ लाख ५७ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया गेले. बाधित शेतकऱ्यांना शासन स्वत:च्या सॉफ्टवेअरद्वारे ३१ मार्चपर्यंत मदत वितरित करील, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु शुक्रवारपर्यंत केवळ ५३ टक्के शेतकऱ्यांच्याच बँक खात्यावर अतिवृष्टीची मदत जमा झाल्याने शासनाची डेडलाइन हुकली आहे.
त्यातच शासनाने ५० हजारांपेक्षा अधिक नुकसान मदतीबाबत पुन:तपासणीचे आदेश दिल्याने वाटप लांबण्याची शक्यता आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत ५ लाख ९५ हजार १४९ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली आहे. दरम्यान, शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने व ३ हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी मदत जाहीर केली आहे. त्यामुळे एकाच शेतकऱ्याची दोन वेगवेगळ्या ठिकाणी बागायत शेती, फळबाग असेल तर त्यांच्या नुकसानीची रक्कम एक ते दीड लाखांपर्यंत होत आहे. मात्र, शासनाने ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यापेक्षा अधिक मोबदल्याची रक्कम असेल तर त्यांची कागदपत्रे पुन्हा तपासण्यात येत असल्याने शेतकरी मदतीविना राहण्याची शक्यता आहे.
जिल्हानिहाय मदत वितरित....छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ४१ हजार ३२९ शेतकऱ्यांना १५५ कोटी ५६ लाख ३३ हजार ९०९ रुपयांचे वाटप झाले आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार ७७४ शेतकऱ्यांना १८७ कोटी ९० लाख २३ हजार रुपये, हिंगोलीतील २४ हजार ९७५ शेतकऱ्यांना १२ कोटी १९ लाख ५० हजार २५० रुपये, बीड जिल्ह्यातील २ लाख ११ हजार २३ शेतकऱ्यांना २२५ कोटी ५५ लाख ८० हजार ९२५ रुपयांचे, तर लातूर जिल्ह्यातील १० हजार ६५१ शेतकऱ्यांना १४ कोटी ८३ लाख २३ हजार ८२२ रुपयांचे, नांदेड जिल्ह्यातील २५ हजार ३९७ शेतकऱ्यांना १३ कोटी ०२ लाख ६० हजार रुपयांचे वाटप ३१ मार्चपर्यंत झाले आहे.