लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील व्यापारी भास्कर पवार (वय ५०) हे बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी भोकरदन पोलीस ठाण्यात केली होती. रविवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील बसस्थानकावर ते आढळले.पवार हे शनिवारी सकाळी दहा हजार रुपये घेऊन दुकानावर गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. बराच शोध घेतल्यावर नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची नोंद भोकरदन ठाण्यात केली. पोलिसांनी रविवारी जळगाव सपकाळ, फत्तेपूर, पिंपळगाव रेणुकाई, सोयगाव येथील नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत.सायंकाळी ते जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील बसस्थानक परिसरात गुंगलेल्या अवस्थेत आढळून आले. पवार यांना कुणी तरी गुंगीचे औषध दिले असावे, अशी चर्चा आहे.तीन दिवसांपूर्वी भोकरदन येथील सेवानिवृत्त तलाठी एकनाथ माळी यांना काही भामट्यांंनी बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन एक लाखाचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर लगेचच हा प्रकार घडला. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
भोकरदनमधील बेपत्ता व्यापारी सापडले भडगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:47 AM