लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींना महापालिकेच्या खाजगी कंत्राटदारामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मिसारवाडी भागातील साईनगर येथे महापालिकेने पाणीपुरवठा केलेल्या टँकरमध्ये चक्क मेलेली पाल आढळून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या भागातील नागरिक टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरतात, हे विशेष.छावणीत दूषित पाण्यामुळे ४ हजार नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याची घटना ताजी असताना महापालिकेचा पाणीपुरवठा विभागही अक्षम्य निष्काळजीपणा करीत असल्याचे समोर येत आहे. शहरातील ७० पेक्षा अधिक गुंठेवारी भागाला मनपातर्फे एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने स्वतंत्र खाजगी कंत्राटदारही नेमला आहेत. नक्षत्रवाडी, कोटला कॉलनी, एन-५ पाण्याच्या टाकी, एन-७ पाण्याच्या टाकीवरून खाजगी टँकरचालकांना पाणी देण्यात येते. मंगळवारी मिसारवाडी भागातील साईनगर येथे महापालिकेच्या टँकरने (एमएच-२३, बी-७३६४) पाणीपुरवठा करण्यात आला. एका नागरिकाच्या ड्रममध्ये मेलेली पाल दिसून आली. टँकर चालकाला ही बाब त्वरित निदर्शनास आणून देण्यात आली. त्याने प्रांजळपणे चूक मान्य केली. मेलेल्या पालीचे पाणी नागरिकांची पिण्यासाठी वापरले असते तर काय झाले असते... या विचारानेच नागरिकांचा थरकाप होऊ लागला. संतप्त नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या वॉर्ड ब कार्यालयात तक्रार दाखल केली. दोषी अधिकारी व टँकरचालकावर कारवाई करावी, अशी मागणी साईनगर येथील नागरिकांनी लावून धरली आहे. या तक्रारीवर लहानू पाईकराव, भास्कर लोखंडे, विष्णू साठे, मंगेश माताडे, मिलिंद चव्हाण, वसंत रगडे, आत्माराम साळवे, नीलेश खोतकर, सुजाता ढगे, सुनीता शेजुळे आदींच्या सह्या आहेत. मनपाने दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
मनपाच्या टँकरमध्ये मेलेली पाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:09 AM