बीड : लोकसभा निवडणूकीत आता उमेदवारांसह नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. नेता किंवा उमेदवार हे शेती, पीक विमा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलायला तयार नाहीत. केवळ जातीच्या मुद्यावरच अधिक चर्चा केली जात आहे.
लाेकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असून १८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ३९ जणांनी ९२ उमेदवारी अर्ज नेले होते. यामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आदींचा समावेश होता. गुरूवारपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहिर सभा घेण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यात चार सभा घेतल्या. आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे त्यांनी माझा वनवास संपला असून आता राज्याभिषेक होणार असल्याचे वक्तव्य केले हाेते. त्यानंतर आष्टीतील सभेत त्यांनी जातीवर भाष्य केले. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची जात काढली जातेय, हे दुर्दैव आहे. यापूर्वीही उमेदवारी जाहिर झाल्यावर जिल्ह्यात पहिल्यांदा येताना जिल्ह्याच्या वेशीवरच जातीबाबत वक्तव्य केले होते. सध्या उमेदवारांसह सभा घेणाऱ्या नेत्यांकडूनही जातीवर भाष्य केले जात आहे. विकासाच्या मुद्यावर फारसे कोणी बोलत नसल्याचे दिसते.
सोशल मिडीयावरही काढली जातेय जातबीड जिल्ह्यात ठरावीक जातीचेच अधिकारी आणले जात असून त्यांची एक यादीच सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. यावर लगेच दुसऱ्याच दिवशी मागील चार वर्षात जिल्ह्यात मराठा व इतर जातीचे किती अधिकारी आले, याचा लेखाजोखाच मांडण्यात आला. सोशल मिडीयावरही सध्या जातीच्या राजकारणावर चर्चा सुरू असल्याचे दिसते.
धनंजय, पंकजा मुंडे यांचेही वक्तव्यआतापर्यंत अनेक सभा झाल्या, भाषणे झाली आणि निवडणूकाही झाल्या, परंतू कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. तसेच हा मुद्दाही समोर आला नाही. परंतू यावेळी जातीचे राजकारण केले जातेय, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक हिंगेंकडून पंकजावर आरोपपंकजा मुंडे यांनी उपोषण करण्याबाबत शिरूर तालुक्यात भाष्य केले होते. यावर वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांनी यावर जोरदार टीका केली. पंकजा मुंडे या संवैधानिक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. उपोषण करण्याचा देशात इतिहास आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानेच राज्यातील लाखो मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. यापुढे असे वक्तव्य केल्यास याद राखा, असा इशाराही हिंगे यांनी दिला.