लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यातील गेवराई सेमी येथून हरवलेला मुलगा ७ वर्षांनंतर पैठण तालुक्यातील सानपवाडीत सापडला. मुलाला बघताच आई वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मुलाने त्यांना मिठी मारली.अनिल उर्फ बट्या प्रकाश साबळे (२०) हा डिसेंबर २०१० मध्ये गेवराई सेमी येथून हरवला होता. त्यावेळी तो थोडा गतिमंद होता. त्याने काही काळ पाचोड येथील एका हॉटेलवर काम केले. तेथे गायकवाड नावाचा एक शेतकरी आला. त्याने त्याला नाव, गाव विचारले पण त्याला त्याची ओळख सांगता येईना. फक्त गेवराई, फुलंब्री, माझे वडील महाराज आहे एवढेच शब्द फक्त अनिल बोलायचा. म्हणून गायकवाड यांनी त्याला आपल्या घरी (सानपवाडीत) नेले व मुलासारखे सांभाळले. त्याच्या नातेवाईकांचा त्यांनी खूप शोधही घेतला, पण कुणी सापडले नाही. ७ वर्षे तो गायकवाड कुटुंबात मुलासारखा राहत होता. यामुळे त्याला कधीच आई -वडिलांची आठवण आली नाही.पंढरपूरला चाललेल्या एका दिंडीमध्ये सानपवाडी येथील एका महाराजांची भेट गेवराई सेमी येथे संदीप घुगे यांच्यासोबत झाली. चर्चेअंती लक्षात आले की, आपल्या गावातील प्रकाश महाराज यांचा मुलगा हरवला आहे. त्यांनी लगेच सानपवाडीत मुलाच्या आई -वडिलांना पाठवले. तेथे सात वर्षापूर्वी हरवलेला अनिल सापडला. गायकवाड कुटुंबाने त्या मुलास आई -वडिलांच्या स्वाधीन केले. सात वर्षानंतर मुलगा सापडल्याने आई-वडिलांना गहीवरुन आले. शिवाय गावकऱ्यांनाही आनंद झाला. त्यांनी गायकवाड कुटुंबाचे आभार मानले.
हरवलेला मुलगा ७ वर्षांनंतर सापडला
By admin | Published: July 17, 2017 12:50 AM