औरंगाबाद : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला डिसेंबर २०२० पर्यंत सध्या प्रतीक्षा करावी लागेल. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यांत कोरोना व्हायरसचा प्रसार, नियंत्रण यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे.
औरंगाबाद मनपासह राज्यातील १२ स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत एप्रिल, मे, जून या महिन्यापर्यंत होती. या १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २८ एप्रिलपासून २८ जूनपर्यंत निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य झाले नाही, असे आयोगाने नगरविकास खात्याला एप्रिल महिन्यात कळविले होते.कोरोना अजून नियंत्रणात आलेला नाही. निवडणुका म्हटल्यावर गर्दी, प्रचारसभा, दारोदारी प्रचार, कॉर्नर बैठका होतात. कोरोनाची साथ नियंत्रणात आली नाही तर वरील सर्व कार्यक्रमांवर बंदीच असेल. त्यामुळे पुढील तीन महिने कोरोनाचा प्रभाव कसा राहतो, यावर निवडणुकांची रूपरेषा ठरेल, असे आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत होती अशी औरंगाबाद मनपा २८ एप्रिल, नवी मुंबई मनपा ७ मे, वसई-विरार २८ जून, कुळगाव-बदलापूर नगर परिषद १९ मे, अंबरनाथ नगर परिषद १९ मे, राजगुरूनगर (पुणे) १५ मे, भडगाव (जळगाव) २९ एप्रिल, वरणगाव ५ जून, केज नगरपंचायत १ मे, भोकर नगर परिषद ९ मे, मोवाड नगर परिषद १९ मे, तर वाडी नगर परिषदेची १९ मे २०२० रोजी मुदत संपलेली आहे. या सर्व ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणूक लांबणीवरमराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम डिसेंबरनंतरच जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पदवीधर निवडणुकीसाठी सुमारे ३ लाख ५२ हजारांवर मतदार नोंदणी गेली आहे. गेल्या निवडणुकीसाठी २० जून २०१४ रोजी मतदान झाले होते. २४ जूनच्या आसपास मतमोजणी झाली होती, तर २२ मे २०१४ रोजी अधिसूचना निघाली होती. विद्यमान लोकप्रतिनिधीची मुदत संपली असून आयोगाकडून कुठल्याही सूचना नाहीत.