छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण जगासमोर उभे ठाकलेले कोरोनाचे संकट हे लसीकरणामुळेच आटोक्यात आले, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे संभाव्य आजार असो, की माता- बाल मृत्यू रोखण्यासाठी पालकांना लसीकरणाकडे डोळेझाक करून चालणार नाही. आता लसीकरणासाठी जिल्ह्यात ७ ऑगस्टपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम ही तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मोहिमेंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेले, तसेच अर्धवट लसीकरण झालेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर, तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. मोहिमेत १०,८७१ बालके, १,६९५ गरोदर मातांचे लसीकरण केले जाणार आहे.
मिशन इंद्रधनुष्य मोहीममातेच्या गरोदरपणात व शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांना योग्य लसीकरण करणे आवश्यक असते. काही कारणांनी लसीकरणापासून वंचित राहिलेले, तसेच अर्धवट लसीकरण झालेली बालके, गरोदर मातांना पूर्णतः लसीकरण करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे.
७ ते १२ ऑगस्ट पहिला टप्पालसीकरणाची ही मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
गर्भवती, मुलांना कधी द्यावी लस?मूल जन्माला आल्यापासून ते वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत लसीकरणाचे विविध टप्पे पूर्ण करावे लागतात, तर गरोदर मातांना धनुर्वात, डांग्या खोकला, तसेच इन्फ्लुएंझा (फ्लू) लस घ्यावी लागते.
लस दिल्यास या आजारांपासून होईल बचावबाळांना वेळापत्रकानुसार लस दिल्यास गोवर, घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, कावीळ आदी जीवघेण्या आजारांपासून बचाव होईल.
७२३ लसीकरण सत्रजिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहीम यशस्वी करण्यासाठी ७२३ लसीकरण सत्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
मोहिमेची माहिती कुठे मिळेल?या मोहिमेची अधिक माहिती जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, तसेच शहरी भागात मनपा, नगरपालिकांच्या आरोग्य विभागाकडे मिळेल.
लसीकरणाचे तीन टप्पे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत ० ते ५ वयोगटातील बालके, तसेच गरोदर माता ज्या लसीकरणापासून वंचित राहिल्या आहेत; अथवा त्यांचे काही कारणांमुळे अर्धवट लसीकरण राहिलेले आहे, त्यांचे ७ ते १२ ऑगस्टदरम्यान लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचे तीन टप्पे राबविले जाणार आहेत.-डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी