लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: लसीकरणापासून वंचित ० ते २ वर्षे वयोगटातील बालक व गरोदर मातांना आजारापासून संरक्षित करण्यासाठी आॅक्टोबरपासून जिल्ह्यात इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली़जिल्हाधिकारी कार्यालयात त्या संदर्भात समन्वय समितीची बैठक घेण्यात आली़ जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात ग्रामपातळीपासून ते महानगरपालिकेपर्यंत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, लिंक वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन असंरक्षित बालके व गरोदर माता यांच्या याद्या तयार कराव्यात़ ज्या भागात असंरक्षित लाभार्थी अधिक आहेत़ त्या भागात आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत ७ ते १४ तारखेला व जानेवारी २०१८ या महिन्यात ८ ते १५ तारखेपर्यंत इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यात असंरक्षित बालके व मातांना त्यांच्या वयोगटानुसार लसीकरण करुन या मोहिमेत लसीकरणाद्वारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना संरक्षित करण्यात येणार आहे़ लसीकरणाचे काम कमी असणारे भाग, जोखीमग्रस्त भाग, अतिदुर्गम, डोंगराळ, सलग तीन सत्रे रद्द झालेली गावे, ए़एऩएम.ची रिक्त पदे, उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, वीटभट्टी, बांधकामे, स्थलांतरित वस्त्या, ऊस तोडणी वस्त्या या भागामध्ये ही मोहीम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे़ बालकांना बीसीजी, पोलिओ, आयपीव्ही, इंजे, पेंटाव्हॅलेंट, डीपीटी व गोवर तर गरोदर मातांना धनुर्वात, लोहाच्या गोळ्या देण्यात येणार आहेत़ तसेच बालकांना क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदूज्वर, कावीळ या आजारासाठी रोग प्रतिबंधक लसी देण्यात येणार आहेत़ बैठकीस उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, आरोग्य अधिकारी डॉ़विठ्ठल मेकाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस़व्ही़ शिंगणे, डॉ़नितीन बोडके, डॉ़ ठाकरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ उत्तम इंगळे, डॉ़ अमोल गायकवाड, प्रमित वाघमारे यांची उपस्थिती होती़
जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:08 AM