वैजापूर : बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई शिघ्र संचार महामार्गासाठी संपादित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना तालुक्यातील लासूरगाव येथील तिघांना ३१ लाख ३७ हजार ८१२ रुपये मोबदला दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, ती तिन्ही खाती होल्ड करण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी बँकांना दिले आहे. प्रशासनाकडून ही चूक झाली की जाणूनबुजून केली, याबाबत चाैकशी होण्याची आवश्यकता असून, याप्रकरणी मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लासूरगाव येथील रहिवासी कांतिराम आबाराव दुधाट यांची लासूरगाव शिवारात गट नंबर ३८३ व ३८४ मध्ये ३ एकर २२ गुंठे जमीन आहे. मात्र, या जमिनीच्या सातबारावर चुकून अर्चना संगेकर व इतरांची नावे लागलेली आहेत. ३८४ गट नंबर शासनाने समृद्धी महामार्गासाठी संपादित केला आहे. या संपादित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कांतिराम दुधाट यांनी अनेक वेळा उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तसेच पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. याशिवाय वैजापूर न्यायालयात या जमिनीवर चुकून लागलेली संगेकर यांची नावे कमी करावीत तसेच संपादित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत संगेकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर होऊन न्यायालयाच्या निर्णयाशिवाय संपादित जमिनीचा मोबदला देणार नसल्याचे लेखी स्वरूपात सांगितले आहे. तरीही उपजिल्हाधिकारी माणिक आहेर यांनी २७ जुलै रोजी संपादित जमिनीचा ३१ लाख ३७ हजार ८१२ इतका मोबदला संगेकर यांना दिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊन मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यानंतर प्रशासनाने अर्चना अशोक संगेकर, प्रभाकर मन्मथप्पा संगेकर व शोभना संगेकर तसेच राजेंद्र मन्मथप्पा संगेकर या तिघांना चुकून मोबदला दिल्याचे सांगत त्यांची बॅंक खाती होल्ड केली आहेत.
दुधाट कुटुंब आत्मदहनासाठी दाखल होताच प्रशासन हादरलेन्यायालयात प्रकरण सुरू असताना जमिनीचा मोबदला परस्पर संगेकर यांना दिल्याचे समजताच कांतिराम दुधाट यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात कुटुंबीयांसह सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी ते उपजिल्हाधिकारी कार्यालयात कुटुंबीयांसह दाखल होताच एकच खळबळ उडाली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यालयात पोलीस बंदोबस्त मागवून घेतला. नजरचुकीने ही रक्कम संगेकर यांना गेल्याचे उपजिल्हाधिकारी आहेर यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांची खाती होल्ड केल्याचे त्यांना सांगितल्यानंतर दुधाट कुटुंबीयांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले.