औरंगाबाद : कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून आजवरची सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. परंतु लसीकरणाच्या तोंडावर गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रांच्या संख्येचा नुसता घोळ सुरु आहे. उद्घाटनाच्या दिवशी जिल्ह्यातील केंद्रांची संख्या आधी १८ , नंतर १३ आणि आता थेट १० करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी पुरेशी नसल्याने केंद्रांची संख्या कमी करण्यात आली का, असा सवाल उपस्थित होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १८ केंद्रांवर शनिवारी लसीकरण होईल, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून १२ जानेवारीला देण्यात आली. ही संख्या बुधवारी १३ करण्यात आली. त्यानंतर केंद्रांची संख्या गुरुवारी आणखी कमी करण्यात आली. पूर्वी नियोजित ३ केंद्रांचा पत्ता कट करण्यात आला. एकूण १० केंद्रांवर पहिल्या दिवशी लसीकरण होणार आहे. या १० केंद्रांमध्ये आता घाटी रुग्णालयाचाही समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ म्हणाले, जिल्ह्यात १३ ऐवजी आता १० ठिकाणी लसीकरणास सुरुवात होईल. ही नावे रात्री उशिरापर्यंत निश्चित केली जातील.
ग्रामीण भागांत ४ केंद्रे
ग्रामीण भागात पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वैजापूर आणि सिल्लोडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड ग्रामीण रुग्णालय अशा ४ ठिकाणी पहिल्या दिवशी लसीकरणाला प्रारंभ होईल. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाऐवजी घाटीचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. शहरात एन ८ आरोग्य केंद्र, एन- ११ आरोग्य केंद्र, भीमनगर आरोग्य केंद्र, सादात नगर आरोग्य केंद्र, बन्सीलालनगर आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण होईल.
केंद्र सरकारची गाईडलाईन
केंद्रांची संख्या कमी झाली आहे. आधी त्यांची संख्या १८ होती. नंतर १३ झाली. आता १० केंद्र ठरले आहेत. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक