संचारबंदीच्या काळात आ. बंब यांचा भाचा संस्कार चांडक (२३, रा. लासूर स्टेशन) हा कारमधून जात असताना औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात फौजदार संदीप शिंदे यांनी त्याला अडविले. लॉकडाऊन असताना कुठे जात आहे? अशी विचारणा अधिकाऱ्याने केली. या वेळी संस्कारने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिकाऱ्याने पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर भाच्याने आ. बंब यांना फोन केला असता आ. बंब औरंगपुरा फुले चौकात आले. या वेळी त्यांची फौजदार संदीप शिंदे यांच्यासोबत शाब्दिक चकमक सुरू झाली. बिस्कीट आणि पाण्याची बाटली घेऊन मुलगा कोविड पेशंटकडे जात होता, तो रिकामा फिरत नव्हता, असे आ. बंब जोरजोराने ओरडू लागले. या वेळी फौजदार शिंदे यांनी आ. बंब यांना पोलीस स्टेशनला चला, अशी तंबी दिली. त्यानंतर काही वेळाने आ. बंब निघून गेले.
क्रांती चौैक पोलीस ठाण्याच्या हद्दीत संस्कार चांडक याच्यावर १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी शहरात विनामास्क तसेच रिकामे फिरणाऱ्या १२२ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.