परभणी- शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही महापालिका रस्त्याची कामे करीत नसल्याने आ. डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला आहे.
परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. एकाही रस्त्यावरुन वाहनधारकांना आपली वाहने सुरळीत नेता येत नाहीत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे या रस्त्यांच्या दुरवस्थेत आणखीच भर पडली. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या अनेक तक्रारी आ.डॉ.राहुल पाटील यांच्याकडे गेल्यानंतर मंगळवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला असतानाही कामे होत नसल्याने शिवसेनेने हे आंदोलन केले.
सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास वसमत रस्त्यावरुन रॅलीद्वारे शिवसैनिक शहरातील रस्त्यांवरुन फिरले. सुपर मार्केट भागातील देशमुख हॉटेल येथील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून मनपाचा निषेध नोंदविण्यात आला. जुना पेडगावरोड भागातही अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी निरज हॉटेल ते अण्णा भाऊ साठे चौक या रस्त्यावरील विनायक हॉटेलसमोरील खड्ड्यामध्ये बसून महापालिकेच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. यावेळी मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्तांच्या विरोधातही शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणला. ढोल -ताशाच्या गजरात अर्धा तास हे आंदोलन करण्यात आले.