राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु होईल. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. सरकारकडून या अधिवेशनसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानच्या यशामुळे उत्साह वाढलेल्या ट्रीपल इंजिन सरकारचा उद्यापासून मनोबल खचलेल्या विरोधकांशी सामना होणार आहे.
मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरून अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे आमदार यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
धोरणात्मक निर्णयांनी गाजणारे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणार निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना आरोग्य व्यवस्थेवरुन पत्र लिहिलं आहे. यावर देखील संजय शिसराट यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पोहोचलं आहे की नाही हे माहित नाही. दिल्लीला एवढ्या चकरा मारता, पवारांच्या सिल्व्हर ओकवर जाता मग मुख्यमंत्र्यांच्या देखील हातात पत्र दिले असते. त्यांनी कसे पत्र पाठवले, याची कल्पना नाही, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, अवकाळी पावसामुळे नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीवरून सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, तर ‘निकाला’चे अस्त्र समोर करून सत्ताधारी विरोधी धार बोथट करण्याचा प्रयत्न करतील. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीवर विधिमंडळात चर्चा होणार असून, सरकारकडून तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरील चर्चेत सभागृहात खडाजंगी होण्याचे संकेत आहेत.