औरंगाबाद : जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरगुती कामांसह दिवाळीला भेटवस्तू देत मतदारसंघातील कामांना कोट्यवधींचा निधी देऊन आमदारांना आपलेसे केल्याचेही खैरेंनी नमूद केले. यावेळी कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूतदेखील उपस्थित होते. त्यांनी मुंबईतून कसा निसटून मतदारसंघात आलो याचे अनुभव कथन करीत त्यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी ५० कोटींची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला.
खैरे म्हणाले, जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी गद्दारी केली आहे. या सगळ्यांचे विधान परिषद निवडणुकीनंतर मुंबईत ‘गुलूगुलू’ सुरू होते. माझ्यासमोर एकेक मिनिटांमध्ये कोपऱ्यात बोलून यांचा प्लान झाल्याची चर्चा सुरू होती. हा प्रकार मी मातोश्रीच्या कानावर घातला होता, असा दावा त्यांनी केला. खैरे म्हणाले, शिरसाट १९९१ सालीही बंड करून काँग्रेसमध्ये गेले होते, पण पुन्हा शिवसेनेत येऊन सर्व काही मिळविले. आता पुन्हा गद्दारी केली. प्रदीप जैस्वाल यांनीही याआधी शिवसेना सोडली होती. जैस्वाल यांना महापौरपद, खासदारकी दिली. त्यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी मी पालकमंत्री होतो, त्यांच्या निवडणुकीचा सर्व खर्च मीच केला होता. लोकसभेत बजेट सुरू असताना ते महापालिकेत ठाण मांडून बसायचे, त्यांचा पराभव झाला. अडीच वर्षांपासून ते घर आणि लॉन व्यतिरिक्त भूमिपूजनाला कुदळ मारण्यापलीकडे कुठे दिसत नाहीत.भुमरेेंना पाच वेळा निवडून आणले. त्यांना उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले, पण तेही शिंदे गटात सहभागी झाले. हे दु:खदायक आहे. त्यांना १९९५ साली मीच उमेदवारी मिळवून दिली होती, असे खैरे म्हणाले. वैजापूरचे आ. बोरनारे, सिल्लोडचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. पण सोबत अजूनही या आमदारांनी मातोश्रीवर जाऊन चूक झाली, असे सांगावे, त्यांना माफ केले जाईल, असा दावाही खैरे यांनी केला.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दगड उचलावायुवा सेनेत शिवसेनेतील सर्व पदाधिकारी, नेत्यांची मुले प्रमुख पदावर आहेत. त्यांच्या मुलांनी बंडखोरांच्या कार्यालयांवर हल्ला करण्यासाठी एक दगड उचलावा, आम्ही दोन दगड उचलू, अशी भावना एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पत्रकार परिषदेनंतर व्यक्त केली.
मला ५० कोटींची ऑफर- राजपूतमला कुणकुण लागली होती. मी थेट औरंगाबादकडे निघालो होतो. माझा मोबाइल बंद केला होता. शिंदे गटाकडून काहीही संपर्क झाल्याबाबत मी कुणाचेही नाव घेऊ इच्छित नाही. मला ५० कोटींची ऑफर होती, पण मला गद्दार म्हणून जगायचे नाही. मी जर आमदार झालो नसतो तर या बॅगा देण्याचे आमिष दाखवलेच नसते, असे आ. राजपूत यांनी स्पष्ट केले.