वाळूज महानगर (औरंगाबाद) : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानास सुरुवात झाली. या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी ७२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वाॅर्डांत बहुरंगी लढत होत आहे. गतवेळी शिवसेनेने १७ पैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. भाजपचे अमित चोरडिया हे एकमेव उमेदवार विजयी झाले होते.
यंदाच्या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेनेत फाटाफूट झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून, या ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. याचबरोबर मूळ शिवसेना व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश गायकवाड यांचेही पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. प्रचार संपल्यानंतर दोन दिवसांपासून सर्वच उमेदवारांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे.
६ वाॅर्डांत १७ जागांसाठी ७२ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ३७ हजार ७१६ मतदार असून यात २१ हजार १०२ पुरुष, १६६०३ महिला व ११ इतर मतदार आहेत. वडगाव-बजाजनगरातील ९ शाळांतील ४६ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात असून प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी एक सहायक पोलीस आयुक्त, दोन निरीक्षक, १५ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच १७५ कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.