खुलताबाद (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील ममनापूर येथील एका लग्नाळू तरुणाने कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत यांना फोन करून ‘साहेब लग्नासाठी मुलगीच मिळेना, तुमच्या सर्कलमध्ये एखादी मुलगी असेल तर बघा, अशी विनवणी केली. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. खुलताबाद शहरातच जवळपास २०० मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात तर यांची संख्या ५०० च्या वर असल्याची चर्चा आहे. लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने मुंडावळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा निघाला होता. मात्र, हा प्रश्न सगळीकडेच भेडसावत आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने फोन केला. ‘घरी सर्व काही चांगलं आहे, आठ एकर शेतीदेखील आहे; पण तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं. त्यानंतर हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तुमच्या सर्कलमध्ये मुली असतील तर पाहा ना, अशी विनंती त्याने केली. यावर राजपूत यांनीदेखील तरुणाला नाराज न करता, बायोडेटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले. सध्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
माझे आणि त्यांचे चांगले संबंधयाबाबत सदरील तरुणास विचारणा केली असता, माझे आणि आ. उदयसिंग राजपूत यांचे चांगले संबंध आहेत. बोलता बोलता मी सहज तुमच्या सर्कलमध्ये लग्नासाठी मुलगी असेल तर बघा, असे म्हणालो. मात्र, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्याने सांगितले.
मदत करण्याचे आवाहनबरेचसे असे फोन येतात. आतापर्यंत आपण ६० ते ७० संबंध जमविले आहेत. या मुलाचा बायोडाटा माझ्या ग्रुपवर टाकून शक्य असल्यास त्याला मदत करा, असे आवाहन केले आहे.- उदयसिंग राजपूत, आमदार, कन्नड.