औरंगाबाद : वाढदिवसाच्या पार्टीसाठी दिलेल्या जेवणाचे बिल मागणाऱ्या केटरिंग व्यावसायिकाला आमदारांचे पुत्र, माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. केटरिंग व्यावसायिक आणि शिरसाट यांच्यातील ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने शहरात चर्चेला सुरुवात झाली.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र व माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपविषयी केटरिंग व्यावसायिक त्रिशरण सत्यवान गायकवाड यांनी सांगितले की, २०१७ मध्ये त्यांना आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जेवणाची ऑर्डर मिळाली होती. या जेवणाचे बिल साडेचार लाख रुपये झाले होते. तेव्हा आ. शिरसाट यांच्या आग्रहावरून आम्ही एकूण बिलात ७५ हजार रुपये कमी केले होते. यानंतर उर्वरित पैसे थोडे, थोडे करून देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर सिद्धांत यांनी आम्हाला धमक्या दिल्या होत्या.
आता १७ डिसेंबर रोजी जेवणाच्या बाकी बिलाची मागणी केली म्हणून फोनवरून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सिद्धांत यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाणे आणि पोलिस आयुक्तालयात तक्रार करणार असल्याचे गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
७५ हजारांची दिली सूट शिरसाट यांच्या विनंतीनुसारसाडेचार लाखापैकी ७५ हजार रुपये कमी केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. याप्रकरणी सिद्धांत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.