औरंगाबाद : पदावरून काढून बदनामी केल्याने अपमानित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा भागातील मनसे कार्यालयासमोर रविवारी सायंकाळी घडली.
अभय अनंतराव मांजरमकर (वय ३०, रा. निसर्ग कॉलनी, पेठेनगर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. अभय मांजरमकर हे मनसेच्या स्थापनेपासून सक्रि य कार्यकर्ते आहेत. मनसेचे शहर (पश्चिम) सहसचिव असे पद त्यांना देण्यात आले होते. शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून त्यांचा वाद झाला होता. त्यावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी २९ जून रोजी अभय यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पदावरून कमी केले होते. याबाबतचे पत्र खांबेकर यांनी थेट अभय यांच्या हातात न देता त्यांनी सोशल मीडियावरून पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पाठविले होते. आपले म्हणणे ऐकून न घेता आपल्याला पदावरून कमी केल्याचे अभय यांच्या जिव्हारी लागले.
याबाबतची खंत व्यक्त करणारी चिठ्ठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावे लिहून ठेवून अभय यांनी रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील मनसेच्या जिल्हा कार्यालयात जाऊन टॉयलेट क्लिनर पिले. विष प्राशन केल्याचा फोनही त्यांनी पक्षाचे पदाधिकारी गौतम आमराव यांना केला. त्यानंतर आमराव हे अन्य कार्यकर्त्यांसह पक्ष कार्यालयात गेले आणि त्यांनी तातडीने अभय यांना समर्थनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद उस्मानपुरा ठाण्यात करण्यात आली.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलेय?अभय यांनी विष पिण्यापूर्वी राज ठाकरे यांना उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्यांनी बारा वर्षांपासून पक्षात काम करीत असलेल्या आपल्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला पदावरून कमी करण्यापूर्वी पदाधिकाऱ्याचा खुलासा घेतला जातो. तसे न करता जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आणि राजू दादा पाटील यांनी मला पदावरून काढण्याचा निर्णय घेतला आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही. म्हणून आत्महत्या करीत आहे. यासाठी संपूर्णपणे जबाबदार सुमित खांबेकर व राजू दादा पाटील असतील, असे नमूद केले.
पक्ष आदेशाने कारवाईमांजरमकर यांच्यावर पक्ष आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमक्षच त्यांना पदावरून हटविण्याचा निर्णय झाला आहे. एका हॉटेलमध्ये मांजरमकर यांनी केलेल्या गैरप्रकाराची वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने दखल घेतली, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.