औरंगाबाद : शहरातील नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या नळाचे कनेक्शन कापण्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना सिटीचौक पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर करण्यात येणाऱ्या पाणीपुरवाठ्याच्या नळाचे कनेक्शन १८ जुलै रोजी सकाळीच तोडले होते. या प्रकरणी उपअभियंता अशोक पद्मे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बिपीन नाईक, वैभव मिटकर, संकेत शेटे, राहुल पाटील, प्रशांत दहीवाडकर, मनीष जोगदंडे यांच्यावर सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. या सर्वांना सीटी चौक पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. या सर्वांनाच न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.