औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि या गोष्टीला महापालिका प्रशासनाने अवलंबलेली पद्धत जबाबदार आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेवर हल्लाबोल केला. शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्यासोबत चर्चा सुरू असताना झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी हातात खुर्ची घेऊन ती निकम यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दालनात एकच खळबळ उडाली.
कोरोना आजाराशी लढा देताना महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप मनसेने केला आहे. औरंगाबादकरांना कोरोना च्या खाईत लोटण्याचे काम महापालिकेने केले. महापालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये प्रचंड सावळागोंधळ आहे. नागरिकांना आंघोळीसाठी गरम पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही, रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून महापालिकेने पगार दिलेला नाही. आशा वर्कर आणि लाळेचे नमुने घेणारे डॉक्टर जीव मुठीत धरून काम करीत आहेत. महापालिकेतील कायमस्वरूपी डॉक्टर मुख्यालयात बसून काम करत आहेत. फिल्डवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढे करण्यात येत आहे. या सर्व प्रकारांचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी मनसेचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले.
अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ त्यांच्या दालनात गेले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यांना समाधान कारक उत्तर मिळत नसल्यामुळे यावेळी दशरथे यांचा पारा चढला. त्यांनी तुम्ही नागरिकांना कोरोनाच्या नावावर मारत असल्याचा आरोप करून खुर्ची उचलून निकम यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. दालनात उपस्थित सुरक्षारक्षकांनी दाशरथे यांना अडविले. यावेळी दाशरथे यांनी निकम यांची केबिन फोडण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्यांना बाहेर नेले. यावेळी मनसेचे संदीप कुलकर्णी, गजत पाटील, अमित दायमा, प्रवीण मोहिते आदींची उपस्थिती होती.
मनसेचा आठ दिवसांपूर्वीच इशारामहापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना कंत्राटी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना थकलेल्या तीन महिन्यांचा पगार त्वरित द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आठ दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
कुंभकर्णाची वेशभूषामहापालिका प्रशासन कुंभकर्णासारखी झोप घेत आहे. प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते कुंभकणार्ची वेशभूषा करून महापालिकेत आले होते.