औरंगाबाद : भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका एकच असल्याने युती झाली होती, आता शिवसेना महाविकास आघाडीसोबत आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मशिदीवरील भोंगा आणि हिंदुत्वाची भूूमिका मांडत आहे. आगामी काळात मनसेसोबत युती करण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच हाती असेल, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मनसे आणि भाजपची युती होणार, यावरून मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. याबाबत डॉ. कराड म्हणाले, हिंदुत्वामुळे मनसे आणि आमची भूमिका एकमेकांना पूरक आहे. राजकीय भूमिकेबाबत प्रदेश पातळीवरील नेते निर्णय घेतील, मात्र हिंदुत्वावरून आमचा मनसेला पाठिंबा आहे. तसेच भोंगे उतरविण्यासाठी पक्षाने सांगितल्यास भाजप कार्यकर्ते भोंगे उतरवतील, भोंगे उतरवण्यापेक्षा हनुमान चालिसादेखील आम्ही म्हणू शकतो, असे डॉ. कराड म्हणाले.
स्वागत समारंभातील हजेरीमुळे चर्चामनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वागत समारंभासाठी हजेरी लावल्यामुळे चर्चेला उधाण आले. यावर डॉ. कराड म्हणाले, ठाकरे शहरात आले असल्याने शहराध्यक्ष संजय केणेकर व हर्षवर्धन कराड यांनी त्यांना निमंत्रण दिले. समारंभासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री अमित देशमुख यांच्यासह इतर नेेतेही आले होते. या भेटीदरम्यान ठाकरे यांच्याशी हलक्या-फुलक्या गप्पा झाल्याचे कराड यांनी सांगितले.