औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत शुक्रवारी येथे स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, भाजपच्या विरोधातील प्रश्नांवर त्यांची भूमिका मवाळ झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे.
ठाकरे हे दोन दिवसांपासून मिशन औरंगाबादच्या निमित्ताने शहरात आहेत. संघटना, निवडणुका, नवीन कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश यात व्यस्त असून, नव्याने संघटना बांधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. इतर पक्षातील प्रस्थापित पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी ठाकरे यांची भेटही घेतली; परंतु पक्षात नवीन कार्यकर्ते घ्यावेत, जुन्यांना डावलून इतर पक्षातील प्रस्थापिताना घेतले तर संकल्पनेतील संघटना उभी राहणार नाही. असे सांगून ठाकरे यांनी चार ते पाच जणांना पक्षात प्रवेश दिला. उर्वरित कार्यकर्त्यांना त्यांनी वेटिंगवर ठेवले आहे.
राज यांच्या आगमनाप्रीत्यर्थ लावलेल्या होर्डिंग्जवर त्यांच्या नावासमोर ‘हिंदूजननायक’ असा उल्लेख आहे. या उपाधीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे काहीसे संतापलेले दिसले. यावर प्रश्न विचारताच त्यांनी थेट हात जोडले. ‘मी असं काही मानत नाही. याआधी माझ्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावेळीही मी असे काही करू नये, अशी ताकीद दिली होती,’ याची आठवण राज यांनी करून दिली.
हिंदुत्वाचा मुद्दा तसं तर मुळात जनसंघाचा आहे. मुद्दा नवा नसतो, तो सुरूच असतो. फक्त कोण तो कशाप्रकारे मांडतो आणि कसा पुढे नेतो, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. जे लोक आपल्या भूमिकांना मुरड घालून सत्तेत गेले, त्यांना याबाबत सडेतोडपणे का विचारले जात नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. झेंड्याची नोंदणी चार वर्षांपूर्वी केली होती, त्याचे अधिकृत अनावरण फक्त आता केल्याचे राज यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करीत असताना शिवसेनेचे मुद्दे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर ठाकरे येणार असल्यामुळे जिल्ह्याचे ‘संभाजीनगर’नामकरणाची मागणी मनसे आ. राजू पाटील यांनी केली होती. ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी संभाजीनगर असा उल्लेख असणाऱ्या बॅनर्सबाबत ठाकरे यांनी ‘नाव बदलल्यास हरकत काय’ असा उलट प्रश्न उपस्थित केला. चांगले बदल व्हायला हवेत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सरप्राईज देतीलदरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करून लवकरच सरप्राईज देतील.