औरंगाबाद- औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे.
राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. मात्र यानंतरही राज ठाकरेंची सभा होणारच असं विधान, मनसेचे औरंगाबादचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केलं आहे.
आज बुधवार २० एप्रिल रोजी औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्राम गृह इथे मनसेची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर सुमित खांबेकर म्हणाले की, कोणी कितीही विरोध असला तरी राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा शंभर टक्के होणार आणि तीही पूर्ण ताकदीने होणार आहे.
आम्ही प्रशासनाच्या विविध परवानग्या घेतल्या आहेत. तसेच आता पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. पोलीसही लवकरच सभेसाठी परवानगी देणार असल्याची माहिती सुमित खांबेकर यांनी यावेळी दिली.
राज ठाकरे यांच्या आदेशाने औरंगाबाद शहरातील विविध भागात महाआरतीचेही आयोजन करण्यात आले, असून आम्ही लवकरच औरंगाबाद शहरातील विविध भागामध्ये जाऊन महाआरती घेणार आहे. तसेच राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला विविध हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा दिला असल्याची माहितीही सुमित खांबेकर यांनी दिली.