औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी आयोजित राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित असलेल्या मनसेच्या नांदेड जिल्हाध्यक्षाची दहा लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, नांदेड येथील मनसेचे पदाधिकारी मनिंदरसिंग उर्फ माँटीसिंग धरमसिंग जहागीरदार हे १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी आले होते. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २०० ग्रॅमची सोनसाखळी चोरली. काहीवेळानंतर माँटीसिंग यांच्या हे निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली.
पाकीटमारीच्या हिस्स्यावरून भोसकलेराज ठाकरे यांच्या सभेत जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे पाकीट मारल्यानंतर पैशांच्या वाटणीवरून अल्पवयीन साथीदाराच्या पोटात चाकू भोसकणारे जुबेर खान जफर खान (२१) आणि अकबर खान रऊफ खान (४६, दोघे रा. बायजीपुरा) या दोघांना ६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्या. ए. एन. माने यांनी सोमवारी दिले. याबाबत जखमीचा नातलग इमरान खान आरेफ खान याने फिर्याद दिली. जुबेर आणि अकबर हे इमरानचे चुलत भाऊ आहेत. ही मंडळी घरच्या महिलांसह भीक मागून उदरनिर्वाह चालवितात. पैसे पुरत नसल्याने रिक्षा चालक समीर महेबूब पठाण याच्या साथीने पाकीटमारी करतात. १ मे रोजी सायंकाळी त्यांनी काही व्यक्तींची पाकिटे मारली. आलेल्या पैशातून त्यांनी बुढीलेन येथील हॉटेलात जेवण केले. मग १४ वर्षीय साथीदाराने अकबरला हिस्सा मागितला. त्यावर दोघांनी त्याला मारहाण केली. जुबेरने त्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.