औरंगाबाद- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी देखील अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिलीप धोत्रे यांनी आज मात्र सर्व बंधने तोडून ओवेसींना अत्यंत कडक आणि खालच्या भाषेत उत्तर दिले आहे. ज्या संभाजीराजे यांना आम्ही दैवत मानतो, त्यांचे हाल करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून अकबरुद्दीन ओवेसी याने आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता त्याचे थडगे देखील औरंगजेबाच्या थडग्या शेजारी बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. तसेच अकबरुद्दीन ओवेसी याच्या अंगात पाकिस्तानाच रक्त असल्याची टीका देखील दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, दरगाहवर जाणे आणि तेथे जाऊन ‘दरूद शरीफ’ पडणे ही आमची संस्कृती आहे. ओवेसी यांनी जाणीवपूर्वक औरंगजेब यांच्याच कबरीवर पुष्प अर्पण केले नाही, तर या भागातील विविध थोर सुफींच्या दरगाहमध्ये जाऊन चादर-पुष्प अर्पण केले. कोणतेही कारण नसताना विरोधकांकडून वाद उकरून काढण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या- ओवेसी
कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात. पण, वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत, तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, असं एमआयएमचे आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले. त्यांनी आज औरंगाबादमधील जनेतला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी हिंदुस्तान झिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे, तेवढाच आमचाही आहे असं त्यांनी सांगितले. या देशात आपण प्रेमानं राहूयात, असेही अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.