छत्रपती संभाजीनगर :मनसे नेते महायुतीत आले पाहिजे आणि मुंबई महापालिका निवडणुकीतदेखील आम्ही सर्वांनी एकत्र लढले पाहिजे, असे मत शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ठाकरे गट एकटा निवडणुका लढवील, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरात एका कार्यक्रमानिमित्ताने आले असता ते बोलत होते. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर काय भूमिका असेल, यावर बोलताना केसरकर म्हणाले की, हे निर्णय येथे होत नसतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना वरिष्ठांशी बोलणं झालेले आहे. त्यादृष्टीने त्यांचा योग्य तो मान राखला पाहिजे, एवढीच अपेक्षा कार्यकर्ता म्हणून आमची आहे. शेवटी ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. विजय मिळवला. त्यांचा मान ठेवला जातो. मंत्रिमंडळात काही दिग्गजांना डावलण्यात येणार, अशी चर्चा आहे, तुम्हीही मंत्रिपदासाठी इच्छुक आहात का, असे विचारले असता केसरकर म्हणाले की, मंत्रिमंडळाबाबतचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. तसेच मंत्रिपद मिळणे ही मोठी बाब असते. मिळाले तर ठीक आहे.