- बापू सोळुंके छत्रपती संभाजीनगर - सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत. मागील दौऱ्यात दिलेल्या कृती कार्यक्रमाचा आढावा त्यांनी आज संपलेल्या त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात घेतला. सोबतच त्यांनी त्यांनी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल जैन समाज आणि माहेश्वरी समाजाच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या.
लोकसभा निवडणुक अवघ्या सहा महिन्यावर आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार उभे न करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येते आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर हे २६ ऑक्टोबर रोजी शहराच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते. पंधरा दिवसापूर्वी पक्षातर्फे गणपती आणि नवरात्र या सणांच्या कालावधीत पदाधिकाऱ्यांसाठी दिलेल्या कृती कार्यक्रम आणि उपक्रमाची माहिती घेतली.
काल २७ रोजी सकाळी मनसे विद्यार्थी सेनेच्या विधानसभा निहाय बैठका सुभेदारी विश्रामगृह येथे घेतल्या. महाविद्यालयीन तरुणांची मतदार नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या बैठकीत पुढील वीस दिवसाचा कृती कार्यक्रम दिला. मारवाडी समाज, सिंधी समाज, माहेश्वरी समाज, ब्राम्हण समाज, राजस्थानी आदी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर ,राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी,दिलीप चितलांगे,वैभव मिटकर ,दिलीप बनकर पाटील, राजीव जावळीकर, अनिकेत निलावार, प्रशांत जोशी अशिष सुरडकर, सतीश सोळुंके आदींची उपस्थिती होती.