युवराज वाकडे
विहामांडवा : कोरोनाचे सावट आल्यानंतर गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे घरोघरी स्मार्टफोनची संख्या वाढली. पण लहान मुले मात्र, स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत. अभ्यास कमी आणि मोबाईलवर गेम खेळण्याचे प्रमाण वाढत असल्याने डोळ्यांचे आजार वाढले आहे तर मुले विद्यार्थी मैदानी खेळांपासून वंचित झाले आहे.
पूर्वी गावागावांत कब्बडी, कुस्ती, खो-खो, विटी-दांडू यासारखी मैदानी खेळ खेळले जात असतात. यात विशेष करून ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर नाव कमवितात. आता मात्र वसाहती वाढत गेल्याने गावात आणि शहरांमध्ये खेळांसाठी मैदानेच उरले नाहीत. त्यामुळे मुलांनी खेळावे तरी कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषकरून शहरी भागात मैदानांसाठी जागा उपलब्ध नाही. अनेक जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळांनाही क्रीडांगणासाठी जागाच उरली नाही. असे असले तरी खेळाडू जिथे मैदान आहे, तिथे खेळण्यासाठी जात असत; परंतु तंत्रज्ञानाच्या युगात मुले मोबाईल गेमकडे आकर्षित झाली आहेत. त्यात कोरोनाचे सावट असल्याने घराबाहेर पडू नका, अशी तंबीच कुटुंबातील वरिष्ठांकडून मुलांना दिली गेली आहे. त्यामुळे मुले मैदानी खेळांपासूनच वंचित राहत आहेत.
व्यायामासाठी मुख्य रस्त्याचा वापर
काही युवक पोलीस व सैन्यभरतीसाठी प्रयत्न करतात. त्यांना ही व्यायामासाठी जागा नसल्याने ते मुख्य रहदारीच्या रस्त्यावर पहाटेच्या सत्रात व्यायाम करताना दिसतात. नागरिक मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडतात. परंतु त्यांना मुख्य रस्त्यावरूनच जावे लागते; परंतु हे रस्ते रहदारीचे असल्यामुळे वाहनांची ये-जा चालूच असते अशावेळी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.