औरंगाबाद : विशेष पथकाच्या तपासणी मोहिमेत हर्सूल कारागृहातील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातील (माेक्का) गुन्हेगार असलेल्या दोन कैद्यांकडे मोबाइल आणि सीमकार्ड सापडले आहेत. या कैद्यांच्या विरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात तुरुंग अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्सूल कारागृहातील कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. आता कैद्यांना बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी मोबाइलही उपलब्ध होत असल्याची घटना समोर आली. पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माेक्का कायद्यान्वये कारागृहात असलेला बीड येथील आरोपी अक्षय शामराव आठवले आणि धुळे येथील आरोपी शामराव भोयर यांच्याकडे विशेष पथकाच्या तपासणी मोहिमेत मोबाइलसह सीमकार्ड आढळून आले आहे. या कैद्यांकडे याविषयी विचारपूस केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर कारागृह प्रशासनाच्या वतीने हर्सूल पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार दोन कैद्यांविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हर्सूल पोलीस करीत आहेत.