औरंगाबाद : महापालिकेच्या अनधिकृत मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई सुरू केल्यामुळे मोबाईल नेटवर्क जाम होत असून, ‘कॉल ड्रॉप’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या एक दिवस बिल भरण्यास अथवा रिचार्ज करण्यास विलंब झाला, तर फोनचा संवाद आणि इंटरनेट सेवा बंद करतात; परंतु तीन दिवसांपासून ग्राहकांना सेवा सुरळीत मिळत नसल्यामुळे कंपन्या त्याची कशी भरपाई करणार, असा प्रश्न आहे.
३२ कोटींहून अधिकची थकबाकी मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे आहे. ती थकबाकी मिळण्यासाठी मनपाने टॉवर्स सील करण्याची कारवाई सुरू केली असून, सुमारे ७ लाख कॉल ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच फोन करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. महापालिका हद्दीत ५९५ मोबाईल टॉवर्स आहेत. त्यातील २०० च्या आसपास टॉवर्स मनपाने थकबाकीपोटी सील केले आहेत. परिणामी टॉवर्सच्या बॅटरीज, जनरेटरमधील इंधन संपले असून, ते भरण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा नियुक्त केली आहे. त्यांना काहीही करता येत नसल्याने टॉवर बंद आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना मिळणारे नेटवर्क कनेक्शन ठप्प पडले आहे. इंटरनेट आणि संवाद सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत बीएसएनएल अथवा इतर कोणत्याही कंपनीच्या स्थानिक अथवा झोन व्यवस्थापकांनी कुठलीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही.
कॉल ड्रॉपची माहिती घ्यावी लागेलशहरात मोबाईल टॉवर सील झाल्यामुळे किती मोबाईलधारक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे, याची माहिती घ्यावी लागेल. बीएसएनएलचे सर्व टॉवर्स अधिकृत आहेत. इतर कंपन्यांच्या टॉवर्सवरून किती ग्राहकांना सेवा मिळते, याची माहिती घ्यावी लागेल. राजेंद्र गांधी, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल
तांत्रिक माहिती अशी : बीएसएनएलच्या तांत्रिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका टॉवरवरून दिवसातून टूजी, थ्रीजीचे ३ ते साडेतीन हजार कॉल ट्रान्झिट होतात. म्हणजेच फोन केले जातात. एक व्यक्ती दिवसातून अनेकदा फोन करते. त्यानुसार ही सरासरी असते; परंतु त्याचा निश्चित आकडा सांगता येणार नाही. बॅटरी आणि जनरेटरमधील इंधन संपल्यास टॉवर बंद पडते. ते सील केल्यामुळे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टॉवरच्या आत जाता येत नाही. परिणामी टॉवर बंद पडते. टॉवर बंद पडले की, नेटवर्क बंद पडते. त्यामुळे मोबाईलधारकांना इंटरनेट आणि कॉल सुविधा मिळत नाही. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई होण्यापूर्वी कंपन्यांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी टॉवर्सकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०० टॉवर जर सील झाले असतील, तर त्याचा परिणाम ७ ते ८ लाख कॉल ट्रान्झिकशन्सवर झाला असेल, असेही सूत्रांनी सांगितले.
मोबाईल कंपन्या टॉवर्सची संख्या रिलायन्स जिओ १६१इंडस टॉवर ९८बीएसएनएल ५१व्होडाफोन २८टाटा ३५आयडिया ३१एटीसी ६१एअरटेल ६०इतर ७०एकूण ५९५