लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शहरातील हनुमान चौक ते गंजगोलाई रस्त्यालगत असलेले मोबाईल दुकान फोडणाऱ्या तिघा चोरट्यांना गांधी चौक पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून साडेसहा लाख रूपयांचे मोबाईल जप्त केले आहेत़ या तिघांपैकी एक चोरटा हा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे़ तर उर्वरित दोघे हे लातूर शहरातील असून, मोबाईल लोकेशनवरून या तिघांचाही पोलिसांना सुगावा लागला़ या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या तुलसी मोबाईलवर राजकुमार भारत माचवे (२१, रा़ दारफळ ता़जि़ उस्मानाबाद), प्रवीण नागलगोणे (२२), जगदीश तोटाळे (२०) (दोघेही राहणार कोल्हेनगर) या तिघांनी गेल्या महिन्यात दरोडा टाकला़ दरम्यान, मोबाईल शॉपीचे छत कापून हे तिघे दुकानात उतरले़ जवळपास नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल घेऊन हे फरार होते़ चोरीपूर्वी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले होते़ त्यामुळे या तिघांचा शोध लावणे गांधी चौक पोलिसांसमोर आव्हान होते़ चोरीतील मोबाईल वापरात आल्यानंतर पोलिसांना लोकेशन कळणार होते़ त्यामुळे पोलीस मोबाईल आणि चोरट्यांवर नजर ठेवून होते़दरम्यान, चोरीतील मोबाईल चोरट्यांनी एकास विकले आणि तो मोबाईल वापरात आला़ त्यानंतर गांधी चौक पोलिसांना लोकेशन हाती लागले़ त्या लोकेशनच्या आधारे गांधी चौक पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या़ त्यांच्याकडून साडेसहा लाख रूपयांचे एकूण ७० मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
साडेसहा लाखांचे मोबाईल जप्त
By admin | Published: May 14, 2017 12:33 AM