औरंगाबाद: शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि दुरूस्तीसाठी आलेले जुने मोबाईल चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, फहेरुद्दीन शेख यांचे टाऊन हॉल उड्डाणपुलाखाली गोल्डन मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि ते घरी गेले. नंतर केव्हातरी चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्लयाातील रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि विविध ग्राहकांचे रिपेरिंंगसाठी आलेले जुने मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.
आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकानमालक शेख यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी दुकान फोडल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक सरवर शेख, कर्मचारी जाधव यांनी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळी संशयितांच्या ठश्यांचे नमुने घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कारवाई बेगमपुरा ठाण्यात सुरू होती.