राम शिनगारे
औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर मोबाईलवर रिमाईंडर लावले जाते. झोपेतून उठवण्यासाठी मोबाईलचा अलार्म काम करतो. त्याच प्रकारे स्वत:चा दुसरा मोबाईल नंबरही मोबाईलमध्ये पाहून सांगावा लागतो. मित्र, नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ असणे तर दूरची गोष्ट. ही सर्व अवस्था मोबाईल नावाच्या यंत्राने केली आहे. माेबाईल कंपन्यांनी वापरकर्त्यांच्या गरजांचा अभ्यास करून त्याप्रमाणे बदल करीत मानवी मेंदूवर नियंत्रण मिळविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सहजासहजी बदलणे शक्य नसल्याचा दावाही काही मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.
असे का होते?
- मोबाईल उद्योगाने ग्राहकांची मानसिकता ओळखून वेळ, अलार्मसह इतर सुविधा उपलब्ध करून देत ब्रेनवर कब्जा मिळवला आहे.
- एकदा सवय लागली की, अवलंबित्व वाढत जाते. दोन बटन दाबले की, सेव केलेला नंबर दिसून येतो. त्यामुळे तो लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची गरज राहत नाही. पूर्वी मोबाईल तुरळक प्रमाणात होते. सेव करण्यासाठी मेमरी अल्प होती. आता त्यात बदल झाला आहे.
- अनेकवेळा व्यक्तीचा चेहरा आठवतो, मात्र नाव आठवत नाही. हे सर्व मेमरी लॉस होण्याचा परिणाम आहे.
असे टाळण्यासाठी हे करावे
-आपण कोणावर तरी अवलंबून आहोत हे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
-दिनचर्या ठरवणे, नैसर्गिक दिनचर्या राखणे आणि स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.
-श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. दिवसात तीनवेळा मी काय करतो ? मला काय केले पाहिजे? जे करतो ते बरोबर आहे का? हे तपासून घेतले पाहिजे.
-सतत डायरी आणि पेन सोबत ठेवले पाहिजे. दिवसात आठ ते नऊ तास झोप घेतली पाहिजेत.
कोट,
आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. प्रत्येक गोष्टी आपण मेहनत न घेता, मेंदूला कोणताही ताण न देता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे मेमरी लॉस होण्यासारखे परिणाम समोर येत आहेत. हे परिणाम दीर्घकालीन असल्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. मेंदूवर सतत ताण दिला पाहिजे.
- डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ
आजोबा
युवा असताना फोन आले. तेव्हा गावात एक दोन फोन होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपूर्वी मोजक्या जणांजवळ मोबाईल होते. त्यामुळे ते नंबर तोंडपाठ होते. आता स्किमनुसार नंबर बदलले जातात. त्यामुळे ते पाठ होणे शक्य होत नाही, असे कृष्णा खेडकर यांनी सांगितले.
वडील
मोबाईलमध्ये सर्वच नंबर सेव असल्यामुळे त्याकडे कधी पाहिलेच नाही. त्यामुळे पाठ करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तरीही घरातील दोघां तिघांचे नंबर पाठ आहेत, असे राजू खेडकर यांनी सांगितले.
नातू
आई-बाबांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ आहेत. मोबाईल नसल्यामुळे नातेवाईकांना फोन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नेहमीच फोन लावण्यासाठी पाठ असलेल्या मोबाईलचा वापर करत असतो, असे नातू ललित खेडकर यांनी सांगितले.