लातूर : पूर परिस्थती हाताळण्यासाठी नागझरी येथे रंगीत तालीम घेण्यात आली. उदगीर आणि अहमदपूर येथील पथकांनाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नवीन रेस्क्यू बोटींचे वितरण यावेळी करण्यात आले. शोध व बचाव पथक उदगीर व अहमदपूर यांना प्रत्येकी एक नवीन बोट तसेच अनुषंगिक शोध व बचाव साहित्य देण्यात आले.
जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिपूर्ण करण्यासाठी पथक अधिक क्षमतेने कार्य करण्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व तालुकास्तरीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी पथके कार्यान्वित करण्यात आली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता आर. के. पाटील, अग्निशमन अधिकारी जाफर शेख, उदगीरचे अग्निशमन अधिकारी विशाल आल्टे, अहमदपूरचे प्रभारी अग्निशमन अधिकारी संभाजी भालेराव, मंडळ अधिकारी टी. डी. चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे श्रीराम वाघमारे, किरण जाधव आदी उपस्थित होते.
रेस्क्यू बोटीचे केले वितरण...अहमदपूर व उदगीरसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते रेस्क्यू बोटींचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्षम काम करण्याचे आवाहन केले. शिवाय, स्वत: रेस्क्यू बोट चालविली.