- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : अमीर खानचा ‘थ्री इडियट्स’ चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्यात एक ‘रँचो’ नावाचे पात्र होते. खऱ्याखुऱ्या आयुष्यातील रँचो ‘सोनम वांगचुक’ यांच्याकडून प्रेरणा घेऊन औरंगाबादेत इयत्ता नववीत शिक्षण घेणारा रँचो ‘हर्षल गुणवानी’ याने ‘गो-कार्ट’ बनविली आहे. त्याची ही गो-कार्ट शहरात लोकप्रिय झाली आहे. तो आता औरंगाबादचा ‘रँचो’ म्हणून ओळखला जात आहे. एकीकडे इलेक्ट्रिक कारची चर्चा सुरू असताना या पठ्ठ्याने चक्क इलेक्ट्रिक गो-कार्ट तयार केली. तिचे संपूर्ण डिझाईनही स्वत:च साकारले.
स्टेपिंग स्टोन शाळेतील हा विद्यार्थी जेव्हा आपल्या गारखेडा परिसरातील घरातून स्वनिर्मित ‘गो-कार्ट’ घेऊन बाहेर पडतो. तेव्हा सर्वजण चकित होतात. ही कार मी बनविली, असे हर्षल जेव्हा सांगतो तेव्हा त्याचे ‘रँचो’ म्हणत कौतुक करतात. हर्षलने सांगितले की, रेसिंग कार बनविण्याची मला इयत्ता पहिलीपासून इच्छा होती. तेव्हा मी टीव्हीवर, मोबाइलवर रेसिंग कार बघून व काडीच्या पेटीपासून रेसिंग कार तयार करत. माझा छंद पाहून वडिलांनी एकदा दिल्ली येथे नेले. तिथे गो-कार्टिंग पाहिले. आपल्यालाही अशीच गो-कार्ट बनवायचे, हा निश्चय करून औरंगाबादला आलो.
गुगलला गुरू करून मागील वर्षी गो-कार्ट निर्मिती सुरू केली. प्लायवूडचा वापर केल्याने पहिला प्रयत्न फसला; पण वडिलांनी ‘पुन्हा प्रयत्न कर’ अशी उभारी दिली व दुसरा प्रयत्न यशस्वी झाला. ८ जानेवारी २०२२ ला गो-कार्ट बनविणे सुरू केले. मेटलचा वापर करीत इलेक्ट्रिक गो-कार्ट बनविण्यास एक महिन्याचा कालावधी लागला. पहिले संपूर्ण डिझाईन कागदावर बनविले व त्यानुसार एक-एक पार्ट तयार केला. ६ इंच लांब व पाठीमागील बाजूस ३ इंच व समोरील बाजूस २ इंच रुंद गो-कार्ट बनविली. आता ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे आहे, असे हर्षलने सांगितले.
पासवर्डशिवाय सुरू होत नाही गो-कार्टहर्षलने बनविलेली गो-कार्ट ‘पासवर्ड’ टाकल्याशिवाय चालू होत नाही. त्याने मागील वर्षी दरवाजा तयार केला होता. त्यात ‘पासवर्ड’चे टेक्निक वापरले होते. तेच टेक्निक गो-कार्टमध्ये वापरले आहे.
सहा तासांत बॅटरी चार्ज ; ५० किमी धावतेहर्षलने सांगितले की, गो-कार्टला ४८ व्होल्ट, ३८ एएमपीची बॅटरी आहे. ही बॅटरी सहा तासांत फुल्ल चार्जिंग होते व त्यानंतर ५० किमी धावते.