पैठण ( औरंगाबाद ) : संतपीठाचे रूपांतर जागतिक दर्जाच्या विद्यापीठात होऊन संत साहित्य व सांप्रदायिक ज्ञानाच्या संशोधनातून या संतपीठातून आधुनिक संत निर्माण व्हावेत अशी अपेक्षा रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सतपीठ लोकार्पण सोहळा समारंभात बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पैठण येथील संतपीठाचे ऑनलाइन उदघाटन केल्यानंतर संतपीठाच्या इमारतीत लोकार्पण सोहळा पार पडला.
रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले, प्र-कुलगुरू शाम सिरसाठ, माजी प्र कुलगुरू तथा विद्यापीठ व संतपीठाचे समन्वयक प्रवीन वक्ते यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून संतपीठाचे प्रत्यक्ष उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. या समारंभासाठी आमदार अंबादास दानवे, माजी मंत्री अनील पटेल, हभप विठ्ठल शास्त्री चनघटे, अण्णासाहेब लबडे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादा बारे, नंदलाल काळे, विनोद बोंबले, ज्ञानेश्वर कापसे, विलास भुमरे, जितसिंग करकोटक, गणेश मडके, प्रशांत जगदाळे, राखी परदेशी, पुष्पा गव्हाणे, अलका पोटे, ज्योती पठाडे, मंगल मगर, किशोर चौधरी, सुनिल हिंगे, भूषण कावसानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
परदेशातून संत साहित्याचा अभ्यासाठी विद्यार्थी येतील संतपीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करावी असे निर्देश मंत्री भुमरे यांनी विद्यापीठ प्रशासनास यावेळी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संतपीठाचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे मंत्री भुमरे व माझी जबाबदारी वाढली आहे. संतपीठातून अभ्यासक्रम वाढविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मुभा असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. दिड महिण्याचा अवधी द्या संतपीठासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ असेही मंत्री सावंत यांनी कुलगुरु येवले यांना उद्देशून सांगितले. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी संतपीठातून संत रामदास स्वामी यांच्या नावाने कोर्स सुरू केला जाईल परंतु यासाठी थोडावेळ लागेल असे मंत्री सामंत यांनी सांगितले. परदेशातून संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी या संतपीठात येतील या दर्जाचे संतपीठ होईल असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
संतपीठाचे दिक्षापीठ व्हावे संतपीठ ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून विषयाचे पुस्तकी व भौतिक ज्ञान देणारे अनेक विद्यापीठ आहेत. मात्र, संतपीठ हे दिक्षापीठ व्हावे अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. वारकरी शिक्षण संस्थांना संतपीठाची सलग्नता देण्यात येईल हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घोषीत केला. विद्यापीठ स्तरावर ३०० परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून संतपीठातील विषय त्यांना समजावून प्रवेश दिला जाईल असेही येवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
आ. अंबादास दानवे संतपीठाचे पहिले विद्यार्थीसंतपीठातून तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख आंबादास दानवे यांनी अर्ज केला असून त्यांनी चार विविध विषयात एमए ही पदवी घेतली आहे.