वेरूळ (औरंगाबाद ) : आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त ‘टर्न स्टाईल गेट’चा शुभारंभ वेरूळ लेणीत आज सकाळी सहा वाजेपासून करण्यात आला. या लेणीत असे एकूण १० गेट बसविण्यात आले. यातील ५ गेट प्रवेशासाठी आणि ५ गेट बाहेर जाण्यासाठी बसविण्यात आले. यापूर्वी केवळ विमानतळ, मेट्रो स्थानक आणि विदेशी पर्यटन स्थळावर अशा गेटचा समावेश होता.
भारतीय पुरातत्व विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत या गेटचा समावेश करून पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटकांत या सेवेबद्दल उत्सुकता दिसून आली. पर्यटकांना लेणी बघण्यासाठी अगोदर बुकींग काऊंटरवरुन शुल्क देऊन कॉईन घ्यावा लागेल. नंतर या गेटमध्ये स्कॅन केल्यावर लेणी बघण्यासाठी प्रवेश मिळणार आहे. लेणी पाहून झाल्यावर बाहेर जातानासुद्धा पुन्हा एकदा स्कॅनिंग केल्यावर हा कॉईन त्या ‘टर्न स्टाईल’ मशीनमध्ये जमा होतो.
हे गेट बनविणाऱ्या संबंधित कंपनीने एकूण पाच हजार कॉईन वेरूळ लेणीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यात ३७५० कॉईन हे भारतीय पर्यटकांसाठी आहेत. १५ वर्षावरील पर्यटकांना ग्रे कलरचा कॉईन असेल, ७५० कॉईन हे पिवळ्या रंगाचे असून ते भारतीय पर्यटकांसाठी (१५ वर्षांच्या आतील), निळ्या रंगाचे ५०० कॉईन हे विदेशी पर्यटकांसाठी आहेत. पूर्वी दिली जाणारी कागदी तिकिटे आता मिळणार असून पेपरलेस काम सुरु झाले आहे. हे गेट बनविणाऱ्या कंपनीचे कर्मचारी लेणी कर्मचाऱ्यांना प्रथम काही दिवस प्रशिक्षण देणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे वेरूळ येथील संवर्धन सहायक राजेश वाकलेकर यांनी दिली.
असे असतील कॉईनचे दर- १५ वर्षांवरील भारतीय पर्यटकांना ग्रे कलरचे कॉईन प्रत्येकी ३० रुपयांना मिळेल.- साडेतीन फूट उंचीच्या भारतीय मुलांना पिवळ्या रंगाचे कॉईन मोफत मिळणार आहे.- तर विदेश पर्यटकांसाठी निळ्या रंगाचे कॉईन असून त्याची किंमत प्रत्येकी ५०० रुपये आहे.
बाहेर पडेपर्यंत सांभाळावा लागेल कॉईन लेणी बघण्याचा मनमुराद आनंद घेण्याच्या नादात पहिल्याच दिवशी काही पर्यटकांचे कॉईन हरविले. त्यामुळे त्यांना बाहेर येण्यासाठी मोठी अडचण झाली. यापुढे हे कॉईन पर्यटकांनी लेणी पाहणे संपण्यापर्यंत सांभाळून ठेवावे, असे आवाहन भारतीय पुरातत्व विभागातर्फे करण्यात आले आहे.