औरंगाबाद : हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे अशा मागणीचे पत्र थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.
या पत्रातील मजकुराचा सारांश असा : मा. प्रधानमंत्री, स्वातंत्र्य मिळून आता ७३ वर्ष झाले असून आपण विविध क्षेत्रात आमुलाग्र प्रगती केली आहे. मात्र, आजही देशात महिलांसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करू शकलो नाही. हैद्राबाद येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर जनतेच्या मनात तीव्र राग आहे. प्रत्येकजण तुम्ही यावर काय बोलणार याची वाट पाहत आहे. आपण तरुणांना उद्याचे भविष्य असे म्हटले आहे. हिच तरुणाई आपल्याला विनंती करत आहे की, अशा गुन्ह्यात कडक कायद्याची अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. आम्ही आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत.
तरुणांच्या प्रतिक्रिया :
स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला समाजातील पितृसत्ताक मानसिकता संपुष्टात आणली तरच अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांना आळ बसेल. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा तरच त्या सुरक्षित राहतील. हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी. - महिमा सांबरे
कठोर शिक्षा व्हावी न्यायालयाने त्या नराधमांना कठोर शिक्षा करावी. जेणे करून अशा हिंसक कृत्यांना आळा बसेल.- अक्षय दराडे
कायद्यात कालानुरूप बदल करावेत सरकारने वेळोवेळी स्त्रियांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन कायद्यात काळानुसार बदल करावा. ही मागणी पत्राद्वारे प्रधानमंत्र्यांना करत आहोत. हैद्राबाद येथील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. - आशिष जावळे
विशेष न्यायालय स्थापन करा
प्रियंका रेड्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारच्या घटना रोखण्यासाठी कायदा आणखी कठोर करत तात्काळ शिक्षा सुनावण्याची तरतुद करण्याची गरज आहे. त्याच बरोबर जिल्हा व तालुका पातळीवर बलात्काराच्या खटल्यांची तातडीने सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे. - मनीषा भ. घायवट
कठोर शासन करावे आरोपींना कठोर शासन करावे, जेणेकरून यापुढे कोणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. - सिंथिया व्हीगेट
केसचा तत्काळ निकाल लावा तुम्ही एका रात्रीत सरकार बनवू शकता मग एका दिवसात बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देणारा कायदा का करू शकत नाही ? विरोधकांनी देखील 70 वर्षे जुन्या घटनेवर न बोलता या बद्दल सरकारला घेरले पाहिजे.- नवनीतकुमार तापडिया