औरंगाबाद : ‘कला’ ही जगण्यातील आनंद निर्माण करते. प्रत्येकाच्या अंगी ‘कला’ असते. त्यामुळे कलाकार काही वेगळा नसतो; पण आपण कलाकारांचे फाजील लाड करीत असतो. त्यासाठी पुरस्कार देणे बंद करा, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांनी मंगळवारी येथे केली.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते मंगळवारी बोलत होते. ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांच्या हस्ते भाई संपतराव पवार यांना ‘मी लोकांचा सांगाती’ या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार देण्यात आला. तसेच नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार रंगकर्मी मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. आगाशे म्हणाले की, आपल्याकडून करून घेणारा तो वरती असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. जगणे सुंदर करण्यासाठी आपल्या अंगी एक ‘कला’(छंद) बाळगली पाहिजे. ती ‘कला’ अशी सहचरणी आहे, जी आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमची साथ देईल. ते पुढे म्हणाले की, मला आज मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून मला साथ देणाऱ्या सर्व सहकलाकारांचा आहे. जंगलात गिधाड कमी झाली आहेत. मात्र, समाजात गिधाड प्रवृत्तीच्या माणसांची संख्या एवढी वाढली की आज चांगली माणसे आहेत का, असा प्रश्न पडतो. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’, असे म्हणत त्यांनी आपले मनोगत थांबविले.
डॉ. आगाशे हे रंगभूमीवरील बुद्धिवान रंगकर्मी असा उल्लेख प्रा. दिलीप घारे यांनी केला. संपतराव पवार यांनी शासकीय मदत न घेता गावाचा विकास केला, असा उल्लेख डॉ. मनोहर जाधव यांनी केला. संपतराव पवार व मोहन आगाशे हे दोघे आयुष्य जगण्याची सूत्र शिकवितात, असे उद्गार ना.धों. महानोर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकप्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कार्यवाह दादा गोरे यांनी केले.
समाजात आत्मभान निर्माण करा पुरस्काराला उत्तर देताना संपतराव पवार म्हणाले की, समाजात मोठे बळ आहे, शासकीय मदतीशिवाय गावाचा विकास होऊ शकतो. हे आत्मभान मी समाजात निर्माण केले. त्यातून गावाचा विकास साधला. सर्व काही सरकार करील ही वृत्ती बदलून स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास समाजात निर्माण केला तर परिवर्तन घडेल. मी काही साहित्यिक नाही; पण समाजकार्य करताना जे काही घडले ते ‘‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकात शब्दबद्ध केले.