छत्रपती संभाजीनगर : पाळत ठेवून कापसाच्या व्यापाऱ्यास पिस्टलचा धाक दाखवीत २७ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या चौघांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी घेतला आहे. लुटणाऱ्या टोळीतील चौघांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर मोक्का लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
कापसाचे व्यापारी साईनाथ तायडे हे शेतकऱ्यांच्या कापसाचे २७ लाख ५० हजार रूपये घेऊन गावाकडे चारचाकी गाडीतुन २० फेब्रुवारी रोजी जात हाेते. तेव्हा त्यांचा पाळत ठेवून पाठलाग करणाऱ्या दिपक आसाराम बर्डे, प्रविण सुभाष राऊत, देविदास रोरे आणि हेमंत वाघ या चार जणांनी त्यांना दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने दिपक बर्डे व प्रविण राऊत या दोघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून ६ लाख ९१ हजार रुपये जप्त केले. प्रमुख आरोपी दिपक बर्डे याने टोळी तयार करून चाेरी, जबरी चोरी, महिलांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने पाठलाग केल्याचे गुन्ह्यांचे अभिलेख तपासल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी टोळीतील सदस्यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्यात मोक्का लावण्यास परवागनी दिली. त्यानुसार गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव, दौलताबादचे विनोद सलगरकर, उपनिरीक्षक सचिन वायाळ, सहायक उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, अंमलदार महादेव दाणे, दिपाली सोनवणे यांनी केली.